शब्दात मी.

हरवण्याचा अन् गवसण्याचा, प्रवास हा अंतरीचा...
चित्रपट समीक्षा -- The Man from Earth (2007)
२ वर्षांपूर्वी
मिसळपाववर एका धाग्यात "The Man from Earth" या चित्रपटाबद्दल वाचलं. मिपाकरांना आवडला, म्हणजे चित्रपट चांगला असणारच, याची खात्री होती. पण हल्ली सवयीप्रमाणे, चित्रपट पाहताना अपेक्षा तशा बाजूलाच ठेवलेल्या असतात. उगीच नंतर वेळ वाया गेल्याची खंत राहत नाही. 
 
विषयांतर होईल कदाचित -- पण खरं तर "पठाण" हा चित्रपट अगदी फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये पाहूनही, काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं असं वाटलं :-) आणि म्हणून एखाद्या चित्रपटाकडून असलेल्या किमान अपेक्षाही बाजूला ठेवून, लेखात चर्चीलेला चित्रपट पाहायला घेतला.
 
----
 
सुरुवातीला काही मिनिटे काहीच अंदाज आला नाही. उत्सुकता मात्र होती. पण जेव्हा चित्रपटातील मुख्य पात्र, इतिहासाचा एक प्राध्यापक, निरोप द्यायला घरी जमलेल्या त्याच्या प्राध्यापक सहकाऱ्यांना सांगतो, की तो स्वतः हजारो वर्षांपासून पृथ्वीवर वावरत आहे, तेव्हा मात्र चित्रपटातील इतर पात्रांप्रमाणे आपण सुद्धा त्या कथेत हळू हळू गुंतत जातो. कथेतील पात्रे, मुख्य पात्राला अनेक प्रश्न विचारतात. खरं तर, आपल्याही मनात नेमके तेच प्रश्न असतात. मुख्य पात्राने अगदी शांतपणे, विचार करून दिलेल्या उत्तरांतून अजून चर्चा होते, नवीन प्रश्न तयार होतात, संवाद तसाच सुरू राहतो. चित्रपटाची कथा, संवाद आपल्याला तात्विक पातळीवर जाऊन विचार करायला भाग पाडतात. मानवाचा आजपर्यंतचा प्रवास, इतिहास-भूगोल, कला-विज्ञान, आस्तिकता-नास्तिकता, श्रद्धा-विश्वास, जन्म-मृत्यू, नाती-गोती, आशा-निराशा, अशा अनेक गोष्टी आपल्या मनाच्या अथांग पटलावर तरंगत्या सोडून, चित्रपट आपला निरोप घेतो!
 
----
 
विचार करायला लावणारा; अगदी वेगळ्या पठडीतला; मेंदूला थोडासा त्रास देऊन, एकाग्रतेने, विचार करता करता, एकदा तरी पाहावा असा चित्रपट!
YouTube link (८३ मिनिटे) -- https://youtu.be/G5Fjr658CQs -- The Man from Earth (2007)

----