शब्दात मी.

हरवण्याचा अन् गवसण्याचा, प्रवास हा अंतरीचा...
पुस्तक परिचय: मनात: भाग १ -- भारतीय विचार
३ वर्षांपूर्वी

----

अभियांत्रिकीमधे करियर असूनही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात रुची जपणारे, किंवा इतर विषयात नाक खुपसणारे, खोऱ्याने सापडतील. अभियंत्यांचा तो अवगुण म्हणावा लागेल, किंवा तार्किक आणि तांत्रिक निश्चिततेचा कंटाळा.


मात्र आवड ते निवड हा कठीण रस्ता फक्त काहींनाच पार करता येतो. एक चांगलं उदाहरण म्हणजे लेखक अच्युत गोडबोले. इंजिनीअरिंग क्षेत्रात यशस्वी करिअर करताना, आपली आवड, उत्सुकता जपत, त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयांवर लिहिलं आहे. "मनात" हे मानसशास्त्राच्या प्रवासावरील पुस्तक त्यातीलच एक. दोन वर्षे अभ्यास करून, मागील दोनशे वर्षातील मानसशास्त्राचा प्रवास त्यांनी सोप्या भाषेत मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ज्यांना मानसशास्त्राबद्दल कुतूहल वाटतं त्यांनी या पुस्तकातून वाचनाची सुरुवात करायला हरकत नाही.

 

"मनात" पुस्तकाचं मुखपृष्ठ
("मनात" पुस्तकाचं मुखपृष्ठ)



मानसशास्त्र या विषयावरील वर्तमानपत्रातलं वाचन सोडलं तर कुठलंही पुस्तक यापूर्वी वाचण्यात आलं नव्हतं. "मनात" पुस्तक हाती आलं, दोन पारायणं झाली, करावी लागली, आणि तरीही मनाच्या प्रवासाला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे, असं वाटलं. या प्रवासात शक्य असेल तितक्या सहप्रवाशांना सोबत घेण्यासाठी ही लेखमाला म्हणजे एक छोटासा प्रयत्न.

इंस्टा-रिल्सच्या जमान्यात पूर्ण पुस्तक वाचणं म्हणजे महाकठीण काम, त्यामुळे या लेखमालेतील लेख, पुस्तकावर आधारित रिल्स समजून वाचायला हरकत नसावी!

----
आकृतीबंध

लेखकाने पुस्तकात मानसशास्त्राचा प्रवास ऐतिहासिक क्रमानं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातील मला भावलेलं, किंवा थोडंफार समजलेलं, असं मोजकंच लिखाण नोंदीच्या स्वरूपात या लेखमालेतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक वाचकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो त्यामुळे संपूर्ण पुस्तक वाचणं कधीही श्रेयस्कर!

मला भावलेलं लिखाण:
१) (मनाचा) भारतीय विचार
२) फ्रॉइड -- मानसशास्त्राचा पहिला प्रवाह, मनोविश्लेषण
३) मानसशास्त्रातील प्रयोगाधारीत व आधुनिक प्रवाह
४) चंगळवाद (मटेरियालिझम)
५) (लेखकाने दिलेल्या संदर्भातून) भावलेली पुस्तके

याव्यतिरिक्त लेखकाने मनाचा व मेंदूचा शास्त्रीय अभ्यास होण्यापूर्वीची अंधश्रद्धेची, गोंधळाची स्थिती; मेंदूरचना; बुद्धीची संकल्पना, अशा बऱ्याच विषयांवर विस्तृतपणे लिहिलं आहे.

"समारोप" या शेवटच्या प्रकरणात लेखकाने खूप चांगली निरीक्षणं, विचार आणि मतं मांडली आहेत, अगदी ओघवत्या भाषेत आणि मनापासून!

----

भारतीय विचार

[खूप खूप पूर्वी]
प्राचीन ऋषी कपिल मुनींनी सांख्यशास्त्रात तीन गुणांचा उल्लेख केला आहे. सत्त्व (सात्त्विक) म्हणजे शुद्ध किंवा प्रकाशमान, तर रज (राजसिक) म्हणजे मंद आणि तम (तामसीक) म्हणजे काळोख किंवा अंधारासम तत्त्व. ह्या गुणात कोणतीही क्रमवारी किंवा उच्च नीच असे न मानता ह्या गुणांना एकमेकांचे पुरक असे मानण्यात आले आहे. या तिन्ही गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती.

[इसवी सन पूर्व दुसरं शतक]
अग्निवेश, किंवा चरक संहितेत, प्रकृती आणि स्वभाव यांचं विश्लेषण केलं आहे. आयुर्वेदात तीन प्रकृतींची माणसं मानलेली आहेत. यांना 'मानसप्रकृती' असं म्हणतात. कफ, वात, पित्त हे त्रिदोष समजून घेतले तर आपल्याला कुठल्याही व्यक्तीच्या प्रकृतीचं विश्लेषण करता येतं.

कफ प्रकृतीच्या व्यक्तींचे इतरांशी संबंध स्थिर असतात. अशा व्यक्ती शांत, मृदुस्वभावी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाच्या असतात. अशा लोकांची मैत्री किंवा शत्रुत्व या दोन्ही गोष्टी दीर्घकाळ टिकतात.

वात प्रकृतीच्या व्यक्ती या मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर असतात. अशा व्यक्ती लहरी, तात्कालिक रागीट, आणि त्यामुळे बेभरवशाच्या असतात. अशा व्यक्ती कुणाच्याही किंवा कशाच्याही चटकन प्रेमात पडतात.

पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान, प्रतिभावान असतात. त्यांना राग अनावर येतो. ते चिडखोर असल्यामुळे त्यांना मित्रमैत्रिणींचे प्रमाण कमी असतं.

"कुठलीही गोष्ट वाऱ्यावर सोडा; तिचा नाद सोडून द्या; निसर्गाला अव्यवस्थितपणा आवडत नाही; त्यामुळे ही गोंधळाची अवस्था तात्पुरती असते. जेव्हा मनाचं चलनवलन नियंत्रित असतं, तेव्हा मन स्फटिकासारखं स्वच्छ होतं; चित्त निर्मळ झालेलं असतं. म्हणजेच तिथला गोंधळ निवळलेला असतो", असं पतंजली म्हणतात.

[१३ वे शतक]
"खालौरा धावे पाणी"
संत ज्ञानेश्वर म्हणतात की ज्याप्रमाणे पाणी खालच्या दिशेनं सहजगत्या जातं, तसंच मन हे अधोगतीला जाऊ शकतं. त्यामुळे त्याला सुसंस्काराची खूप आवश्यकता असते.

"संत तेच जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी|
लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तेचि जाणा||.
इहपरलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी|.
मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा||"
धाकटी मुक्ता, मोठ्या बहिणीसारखी, उद्विग्न ज्ञानेशाची समजूत काढते, मनाची ताटी उघडावी म्हणून.

[१४ वे शतक]
"ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा"
संत चोखामेळा बाह्य रुपापेक्षा अंतर्मनात डोकावण्याचा सल्ला देतात.

[१५ वे शतक]
"ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोये|
औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए||"
संत कबीर आपल्या दोह्यातून जगणं शिकवतात.

[१७ वे शतक]
"मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"
या सुखाचा मूलमंत्र संत तुकाराम देतात.

"अचपळ मन माझे, नावरे आवरिता"
समर्थांनी करुणाष्टकात म्हटल्याप्रमाणे "मन" खूप चंचल, अस्थिर आहे. कितीही आवरायचा प्रयत्न केला तरीही न आवरणारं.

"येथ बोल ना ही जनासी| हे अवघे आपणास पासीl
सीकवावे आपल्या मनाशीl क्षण क्षणा|"
स्वतःच्या मनाला निरंतर शिकवावे, जनाला नाही, असं समर्थ आपल्या प्रथम पुरुषी वचनात केलेल्या लिखाणातून अगदी समर्पकपणे सांगतात.

[१९ वे शतक]
"आंतरिक असो वा बाह्यजगाचं ज्ञान, ते केवळ मनाच्या एकाग्रतेनं मिळविता येतं."
भारतीय तत्वज्ञ स्वामी विवेकानंद एका व्याख्यानात मनाच्या एकाग्रतेचं महत्व सांगतात.

"मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर..."
कवयित्री बहिणाबाई मनाचं चपखल वर्णन करतात. मनाचं कोतेपण, विशालता, चंचलता, सारं काही मांडताना त्या जीवनाचं तत्वज्ञान सांगतात.

----

मनाचा भारतीय विचार ऋषीमुनी, संत, तत्वज्ञ, साहित्यिक, कवी असा प्रवास करत सामान्यांपर्यंत पोहोचतो.
या प्रवासात अलीकडच्या काळात, मागच्या दोन शतकात, भारतीय शास्त्रज्ञांचा खूप काही विशेष सहभाग आला नाही याची खंत लेखक व्यक्त करतो.

थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, आपला स्वतःशीच निरंतर संवाद सुरू असायला हवा, मनाला समजून घेण्यासाठी आणि घडवण्यासाठी.
मानसशास्त्रासारख्या वरवर क्लिष्ट वाटणाऱ्या विषयात फक्त एवढंच अभिप्रेत असावं!

----