शब्दात मी.

हरवण्याचा अन् गवसण्याचा, प्रवास हा अंतरीचा...
चौकट
-11 दिवसांपूर्वी

माणूस स्वतःसाठी एक अदृश्य अशी मानसिक, वैचारिक, नैतिक आणि सामाजिक चौकट तयार करतो, स्वतःची ओळख, अस्तित्व जपता यावं म्हणून. अशी चौकट स्वतःहून तयार करणं, ती काळानुरूप बदलणं, अनुभवांनी समृद्ध करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर संवाद साधता येणं, हे खरं तर एका विचारी आणि निरोगी मनाचं लक्षण. अर्थातच, ते वाटतं तितकं सोपं नाही.

प्रत्येक नात्यात बऱ्याचदा अशा चौकटी अव्यक्तच राहतात. समोरच्याला गृहीत धरलं जातं, अविश्वास थोड्या प्रमाणात का असेना, पण जपला जातो. विरोधाभास म्हणजे, अपेक्षाही केली जाते. साहजिकच, संवादातील मोकळेपणा कधीच गवसत नाही. बऱ्याचदा आपण म्हणतो, की संवाद हरवला. खरं तर, तो कधी गवसलेलाच नसतो. 

जिथे या चौकटी स्पष्ट असतात, तिथे मात्र संवाद थोडाफार तरी गवसतो. संवादातून चौकटी अजून स्पष्ट होतात, विश्वास दृढ होतो, आणि अशी नाती आयुष्यभर जपली, जोपासली जातात. तुलनेने, बऱ्याच नात्यांमध्ये ही चौकटींची स्पष्टता आपल्याला स्वतःला तयार करावी लागते. आधी चौकट, की आधी संवाद, ही पहिली पायरी खूप अवघड असते. सर्वांनाच ते जमतं असं नाही. त्यापुढील सुरुवातीच्या काही पायऱ्याही कठीणच, विश्वास दृढ होईपर्यंत. आणि त्याहून कठीण गोष्ट म्हणजे, हा विश्वास आणि चौकटींतील स्पष्टता, नियमित व्यक्त करून, काटेकोरपणे जपणं. 

कोणतंही अर्थपूर्ण नातं, विश्वास आणि स्थिरतेच्या पायावर उभं राहतं, टिकतं; मोकळ्या व प्रामाणिक संवादातून जोपासलं जातं; आणि चौकटींतील स्पष्टतेतून, आदर जपत, वेळेसोबत ते मजबूत होत जातं.